परभणी : पेट्रोल, डिझेलचे वाढते दर कमी करून सामान्य जनतेला दिलासा देण्यात केंद्र शासन सपशेल अपयशी ठरले आहे, असा आरोप करीत काँग्रेसच्या वतीने परभणी शहरात सोमवारी (ता. २९) निदर्शने करण्यात आली. जिल्हा काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने इंधन दरवाढीच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना वेगवेगळी निवेदने देऊन दरवाढीचा निषेध करण्यात आला.
जग सध्या कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे. या संकटाने लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. उद्योगधंदे अजूनही पूर्वपदावर आलेले नाहीत. बहुसंख्य जनता जगण्यासाठी धडपड करत आहे. अशा कठीण प्रसंगी पेट्रोल, डिझेलच्या महागाईने आणखी एक संकट लोकांवर ओढावले आहे. या दुहेरी संकटाचा सामना करतांना सामान्य जनतेची प्रचंड तारांबळ उडत आहे.
पारदर्शकता राहिलेली नाही
ता. सात जूनपासून इंधनाच्या दरात दररोज वाढ केली जात असून शनिवारपर्यंतची ही दरवाढ पाहता पेट्रोलमध्ये प्रति लिटर ९.१२ रुपये, तर डिझेलमध्ये ११.०१ रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. देशभरात पेट्रोलच्या किमती प्रति लिटर ८७.८८ रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. तर दिल्लीमध्ये डिझेल पेट्रोलपेक्षा जास्त महाग आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर निच्चांकी पातळीवर असताना त्याचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही. वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किमतीचा विचार करू देशांतर्गत इंधनाचे दर ठरविले जात असतांना सध्या ती पारदर्शकता राहिलेली नाही, असा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.
जनतेला लाभ देण्यात यावा
२०१४ मध्ये पेट्रोलवर उत्पादन शुल्क हे ९.४० रुपये, तर डिझेलवर ३.५६ रुपये होते. सध्या हेच शुल्क पेट्रोल ३२.९८ रुपये, तर डिझेल ३१.८३ रुपये असे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती पाहता पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करून सामान्य जनतेला त्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर यांच्यासह नदीम इनामदार, बाळासाहेब देशमुख, स. समी स. साहेबजान, नागेसन भेरजे, मिन्हाज कादरी, पंजाबराव देशमुख, रविराज देशमुख, पवन निकम, शिवाजीराव बेले, आगामिया पटेल, ज्ञानेश्वर मुळे, राजेश रेंगे, दीपक भालेराव आदी होते.
युवक काँग्रेसच्या वतीने निदर्शने
पेट्रोल, डिझेलचे वाढते दर कमी करून सामान्य जनतेला दिलासा देण्यात केंद्र शासन सपशेल अपयशी ठरले आहे, असा आरोप करीत काँग्रेसच्या वतीने परभणी शहरात आंदोलन केले. वसमत रस्त्यावरील एका पेट्रोलपंपासमोर परभणी जिल्हा युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी अभय देशमुख, श्रीकांत पाटील, सचीन जवंजाळ, अब्दुल सईद अहेमद, अकबर जागीरदार, बाबा ढगे, शेख जम्मू, जावेद शेख, दत्ता कदम, शेख गौस आदी या निदर्शनामध्ये सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.